सिंधुदुर्गसह सात जिल्ह्यांतील नागरिकांना मते मांडण्याची संधी; कोकण भवनात प्रत्यक्ष, तर जिल्हाधिकारी कार्यालयांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात २१ आणि २२ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय स्तरावर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. विवाह, घटस्फोट, सहजीवन संबंध, भरण-पोषण, पालकत्व आणि वारसाहक्क यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर नागरिकांना आपली मते मांडता येणार आहेत. संबंधित संस्था, संघटना, गटांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी या जनसुनावणीत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समिती महाराष्ट्रातील विविध महसूल विभागांमध्ये जनसुनावणी घेणार आहे. या प्रक्रियेतून समान नागरी कायद्याबाबत नागरिकांच्या अपेक्षा, सूचना आणि भूमिका जाणून घेतल्या जाणार आहेत.
कोकण विभागातील जनसुनावणीचे आयोजन नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले आहे. जिल्हानिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, २१ नोव्हेंबर रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची सुनावणी होईल. तर २२ नोव्हेंबर रोजी ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांची सुनावणी होणार आहे.
जिल्हानिहाय जनसुनावणीचे वेळापत्रक
| दिनांक | जिल्हा | वेळ |
|---|---|---|
| २१ नोव्हेंबर | मुंबई शहर | सकाळी ११ ते दुपारी १२ |
| २१ नोव्हेंबर | मुंबई उपनगर | दुपारी १२.३० ते १.३० |
| २१ नोव्हेंबर | पालघर | दुपारी ३ ते ४ |
| २१ नोव्हेंबर | सिंधुदुर्ग | दुपारी ४.३० ते ५.३० |
| २२ नोव्हेंबर | ठाणे | सकाळी ११ ते दुपारी १२ |
| २२ नोव्हेंबर | रायगड | दुपारी १२.३० ते १.३० |
| २२ नोव्हेंबर | रत्नागिरी | दुपारी ३ ते ४ |
जनसुनावणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निर्धारित वेळेच्या किमान एक तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची समितीसमोर प्रत्यक्ष सुनावणी होईल. तर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची मते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समितीसमोर मांडली जातील.
ज्या नागरिकांना प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहणे शक्य नाही, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या समान नागरी कायदा पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने आपली मते नोंदवता येणार आहेत. या पोर्टलवर ३७ मुद्द्यांबाबत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
समान नागरी कायद्याच्या संभाव्य तरतुदींबाबत नागरिकांच्या विविध भूमिका आणि सूचना जाणून घेण्याच्या दृष्टीने ही जनसुनावणी महत्त्वाची मानली जात आहे.











