१३०० स्पर्धकांमधून अंतिम फेरीत निवड; चित्रकलेतील गुणवत्तेची राज्यस्तरावर मोहोर
मालवण (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मालवणच्या कु. गिरीजा विद्याधर परुळेकर हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुंबईतील व्ही. एन. सुळे गुरुजी स्कूल, दादर येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या गिरीजाने या स्पर्धेत प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शालेय स्तरावर सुमारे १३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून दोन गटांतील निवडक १०० विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. बालदिनाचे औचित्य साधून मुंबईतील एस.एन.डी.टी. विद्यालय, चर्चगेट येथे ही अंतिम स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत गिरीजाने आपल्या चित्रकलेतील कौशल्याची छाप पाडत पारितोषिक मिळवले.
या यशाबद्दल गिरीजाला प्रमाणपत्र, ७ हजार ५०० रुपयांचे रोख पारितोषिक, बॅग, बोरोसिल वॉटर बॉटल, टी-शर्ट आणि कॅप देऊन गौरविण्यात आले. याशिवाय तिला २ हजार रुपयांचे अतिरिक्त रोख पारितोषिकही प्रदान करण्यात आले.
गिरीजाला तिच्या गुरुकुल क्लासचे संचालक पृथ्वीराज कांबळी सर आणि सागर कांबळी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरावरील या यशामुळे मालवणच्या शैक्षणिक आणि कलाक्षेत्रातून तिचे विशेष कौतुक होत असून, विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









