बागायतदारांचे लाखोंचे नुकसान; वर्षानुवर्षे जपलेल्या कलमांची राखरांगोळी
मालवण (प्रतिनिधी) : आडारी माळरानावर शनिवारी दुपारी लागलेल्या भीषण वणव्याने आडारी, खैदा आणि न्हीवे परिसरातील आंबा-काजू बागायतींना मोठा फटका बसला. वणव्याने रौद्ररूप धारण केल्याने अनेक बागायतदारांची आंबा-काजूची कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, वर्षानुवर्षे मेहनतीने जोपासलेल्या बागा डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
माळरानावरील सुकलेल्या गवताला आग लागल्यानंतर ग्रामस्थांनी ती विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, उन्हाची तीव्रता आणि सुकलेल्या गवतामुळे आगीने वेगाने परिसर व्यापला. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनंतर नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी तातडीने अग्निशमन बंब घटनास्थळी पाठविला. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत काही प्रमाणात आग आटोक्यात आणली. मात्र, दुपारी साडेतीनच्या सुमारास आगीने पुन्हा भडका घेतला आणि आडारी, खैदा व न्हीवे माळरान परिसरात ती पसरली.
या वणव्यात परब यांच्या सुमारे १०० आंबा कलमांचे, विशाल फणसेकर यांच्या २५ आंबा कलमांचे, सुबोध पाटकर यांच्या १० काजू कलमांचे, तर तातोबा करलकर यांच्या १० आंबा-काजू कलमांचे नुकसान झाले. याशिवाय अरुण ढोलम, हरिश्चंद्र ढोलम, विशाल ढोलम, पाताडे, राकेश पाटकर, लाड आणि आचरेकर यांच्या बागांनाही आगीची झळ बसली.
आंबा आणि काजूच्या बागा उभ्या करण्यासाठी शेतकरी अनेक वर्षे मेहनत घेतात. मात्र, काही तासांच्या वणव्यात ही मेहनत राख झाली. उत्पन्नाचे साधन असलेल्या बागायती जळाल्याने बागायतदारांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
घटनेची माहिती मिळताच तलाठ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि नुकसानग्रस्त बागायतदारांकडून नुकसानीची माहिती घेतली. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. नुकसानग्रस्त बागायतदारांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.











