उबाठा शिवसेनेच्या गौरी सावंत यांचा सवाल; पूजेला विरोध नाही, मात्र किनाऱ्यावरील कचऱ्याचे काय?
मालवण (प्रतिनिधी) : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर छठपूजेनंतर पूजा साहित्य सोडून देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता आणि सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत उबाठा शिवसेनेच्या महिला मालवण उपशहरप्रमुख गौरी सावंत यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. छठपूजेला परवानगी देण्यास आक्षेप नसला, तरी पूजेनंतर किनाऱ्यावर टाकलेले साहित्य उचलण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्याच्या विविध भागांत छठपूजेवरून काही ठिकाणी विरोधाचे सूर उमटत असतानाच मालवण बंदर जेटी परिसरातील समुद्रकिनाऱ्यावरही परप्रांतीय नागरिकांकडून छठपूजेचे आयोजन करण्यात आले. मात्र, पूजा झाल्यानंतर पूजेसाठी वापरण्यात आलेले साहित्य किनाऱ्यावरच सोडून देण्यात आल्याचे गौरी सावंत यांनी निदर्शनास आणले. त्यांनी प्रत्यक्ष किनाऱ्यावर जाऊन या साहित्याची पाहणी केली आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले.
मालवण हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असलेले पर्यटनस्थळ आहे. येथील समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्थानिक नागरिक सातत्याने प्रयत्न करत असतात. गणेश विसर्जनानंतरही मालवणवासीय पूजा साहित्य आणि निर्माल्य समुद्रकिनाऱ्यावर न टाकता प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी जमा करतात. मग अन्य धार्मिक कार्यक्रमांच्या वेळीही अशाच प्रकारची जबाबदारी का पाळली जात नाही, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला.
छठपूजेसाठी प्रशासनाची परवानगी कोणी दिली? परवानगी दिली असेल तर पूजेनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था का करण्यात आली नाही? किनाऱ्यावर सोडलेले पूजा साहित्य उचलण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असे सवाल त्यांनी केले आहेत.
आज एक पूजा झाली, उद्या प्रमाण वाढल्यास काय?
आज एकदा छठपूजा झाली आहे. भविष्यात इतर शहरांप्रमाणे मालवणमध्येही अशा पूजांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी पूजा साहित्य समुद्रकिनाऱ्यावरच सोडले गेले, तर समुद्र आणि किनारपट्टीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, अशी भीती गौरी सावंत यांनी व्यक्त केली.
धार्मिक कार्यक्रमांना विरोध करण्याचा मुद्दा नसून, कोणताही धार्मिक विधी पार पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी संबंधितांनी स्वीकारली पाहिजे. मालवणच्या समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य आणि पर्यावरण जपण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.











