सात दिवस भक्तिमय सोहळा; भजन मंडळांच्या सेवेमुळे गावात चैतन्यमय वातावरण
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील डांगमोडे येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव रवळनाथ मंदिरात सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे. दारूबंदीचा पुरस्कर्ता म्हणून ओळख असलेल्या श्री देव रवळनाथाच्या दर्शनासाठी तसेच हरिनाम सप्ताहात सहभागी होण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
या सप्ताहानिमित्त मंदिरात अखंड हरिनाम जप सुरू असून, विविध गावांतील भजन मंडळे मंदिरात उपस्थित राहून आपल्या भजन कलेच्या माध्यमातून श्री देव रवळनाथाची सेवा करत आहेत. भजन, हरिनामाचा गजर आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण डांगमोडे गावात भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
या सात दिवसीय हरिनाम सप्ताहाची सांगता शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री देव रवळनाथ देवस्थान ट्रस्ट, मसुरे-डांगमोडे, ठाकूर कुटुंबीय आणि डांगमोडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.











