कट्टा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाला भेट
मालवण (प्रतिनिधी) : कट्टा बाजारपेठ येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल-रखुमाई व लक्ष्मी-नारायण मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेऊन जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले.
हरिनाम सप्ताहात वीणा आणि चिपळ्या हाती घेत प्रमोद कामत भक्तिरसात तल्लीन झाले. त्यांच्या या भक्तिमय सहभागाने सप्ताहातील वातावरण अधिकच चैतन्यमय झाले. यावेळी जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती तसेच देवस्थान समिती ट्रस्टचे अध्यक्ष संतोष साठविलकर यांच्या हस्ते प्रमोद कामत यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कांता भोगटे, कट्टा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रवीण गाड, मंदार मठकर, सागर माळवदे, अक्षय पावसकर, गणेश गाड, विनय मठकर, राजा पावसकर, जगदीश मोरजकर आदी उपस्थित होते.












