शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश; राज्यातील १ लाख ८ हजार शाळांपर्यंत उपक्रमाचा विस्तार करण्याचे नियोजन
मुंबई (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, स्वावलंबन आणि देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड प्रशिक्षणाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. राज्यातील १ लाख ८ हजार शाळांमधील सुमारे २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण बंधनकारक करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. सध्या राज्यातील ३० हजार शाळांमधील सुमारे १७ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जात आहे.
‘आनंददायी शनिवार’मध्ये दोन तासिका
राज्यातील सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईड उपक्रमाचा विस्तार करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री भुसे यांनी हे निर्देश दिले. ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून शालेय शिक्षण विभाग काम करीत असून, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना आणि शिस्तीची जोपासना करण्यासाठी स्काऊट-गाईड उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमांतर्गत परेड, संचलन आणि देशभक्तिपर गीतांवरील कवायती बंधनकारक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत आठवड्यातून दोन तासिका स्काऊट-गाईड प्रशिक्षणासाठी घेण्याचे निर्देशही मंत्री भुसे यांनी दिले.
शिक्षकांना सात दिवसांचे प्रशिक्षण
स्काऊट-गाईड उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शाळांमधील शिक्षकांना तालुकास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शुल्क आणि प्रशिक्षकांचे मानधन शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येईल, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.
पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणांत वाढ होणार?
स्काऊट-गाईड उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याचाही विचार सुरू आहे. सध्या राज्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना तीन, तर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक मंगेश जोशी, उपसचिव तुषार महाजन, स्काऊट-गाईडचे सहायक राज्य सचिव रमेश जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील सर्व शाळांपर्यंत स्काऊट-गाईड प्रशिक्षण पोहोचविण्याच्या या नियोजनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शिस्त, सहकार्य, नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारीचे धडे मिळण्यावर भर दिला जाणार आहे.
Meta Description (English): Maharashtra School Education Minister Dadaji Bhuse directs expansion of Scout-Guide training to 108,000 schools and approximately 21 million students across the state.











