सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनानिमित्त दहा स्पर्धांचे आयोजन; साहित्य, संस्कृती आणि डिजिटल माध्यमांचा संगम
मालवण : वाचनसंस्कृतीची रुजवण, मराठी भाषेची गोडी आणि नव्या पिढीतील सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनानिमित्त विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील एकूण २९८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
वक्तृत्व, शब्दकोडे, प्रश्नमंजुषा, कविता रसग्रहण, स्वरचित काव्यवाचन, कथालेखन, अभिवाचन, जिल्ह्यातील लेखकांच्या साहित्यसंपदेची ऑनलाइन स्पर्धा, साहित्ययात्री रील स्पर्धा आणि महिलांसाठी उखाणे अशा दहा प्रकारांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.
शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन युवकांपर्यंत, पालकांपासून साहित्यप्रेमींपर्यंत आणि महिलांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विविध घटकांना या उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळाली. पारंपरिक साहित्यप्रकारांबरोबरच सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून साहित्याचा प्रसार करण्यासाठी रील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २०२६ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असून यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिके, ग्रंथभेट, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतून जिल्ह्यातील नवोदित लेखक, कवी, वक्ते, वाचक आणि कलावंतांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.










