तन्वी परब द्वितीय, यतिका जाधव तृतीय; विजेत्यांना रोख पारितोषिकांसह ग्रंथभेट
मालवण : नवोदित युवा लेखकांमध्ये कथालेखनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या सर्जनशील लेखनकौशल्याला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनानिमित्त आयोजित कथालेखन स्पर्धेत वैभव मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या ‘विघटन’ या कथेला परीक्षकांनी प्रथम क्रमांकासाठी निवडले.
या यशाबद्दल वैभव मेस्त्री यांना चार हजार ५०० रुपये रोख, ५०० रुपयांची ग्रंथभेट आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. तन्वी परब हिने ‘सुरंगीचा बहार’ या कथेसाठी द्वितीय क्रमांक मिळविला. तिला दोन हजार ५०० रुपये रोख, ५०० रुपयांची ग्रंथभेट आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
यतिका जाधव हिने ‘निकालाच्या पलीकडे’ या कथेसाठी तृतीय क्रमांक पटकावला. तिला एक हजार ५०० रुपये रोख, ५०० रुपयांची ग्रंथभेट आणि स्मृतिचिन्ह मिळणार आहे.
दर्श बलराम सामंत यांची ‘सान्यार’ कथा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. वैश्विका नागेश कदम यांची ‘शाळेची शेवटची घंटा’ आणि वेदांत अवंती शिवप्रसाद नाईक यांची ‘चित्कला’ या कथांना उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला. श्रुती राऊळ यांच्या ‘झाकोळा’ या कथेला उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक मिळाला.
या स्पर्धेत २७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विविध विषयांवरील कथांमधून नव्या पिढीच्या लेखनातील कल्पकता आणि सामाजिक जाणिवांचे दर्शन घडले.











