मराठी शब्दसंपत्ती आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या जीवनकार्याची ओळख करून देण्याचा उपक्रम
मालवण : मराठी भाषेतील शब्दसंपत्ती वाढविणे, पालकांमध्ये भाषेची गोडी निर्माण करणे आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या जीवनकार्याची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आयोजित शब्दकोडे स्पर्धेत महादेव श्रीहरी घोडके आणि सुषमा युगलकिशोर प्रभूगांवकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
२५ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत गौरी अभिजीत केणी हिने द्वितीय, तर पांडुरंग कृष्णा राणे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. चित्रा निलेश हिरे हिला उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळाला. विवा विराज तळाशिलकर आणि सायली श्रीकृष्ण परब यांनी उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत ३३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. नेहा हुनारी, ऋतुजा केळकर आणि गौरी केळुसकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
साहित्य आणि भाषेच्या अभ्यासाला खेळकर स्वरूप देणाऱ्या या स्पर्धेतून मराठी शब्दांची ओळख, भाषिक आकलन आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या सामाजिक कार्याविषयी जाणिवा वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व यशस्वी स्पर्धकांना ग्रंथभेट आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २०२६ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असून यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिके, ग्रंथभेट, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतून जिल्ह्यातील नवोदित लेखक, कवी, वक्ते, वाचक आणि कलावंतांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.











