मालवण : कवितेतील आशय, भावभावना आणि काव्यसौंदर्य समजून घेण्याची क्षमता विकसित व्हावी, तसेच वाचन आणि साहित्याची आवड वाढावी, या उद्देशाने आयोजित काव्य रसग्रहण स्पर्धेत ओरोस येथील वैदेही विलास आरोंदेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्या आयोजनातून २५ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत वैदेही आरोंदेकर यांना तीन हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथभेट असे पारितोषिक जाहीर झाले आहे. मालवण येथील दीपक धर्माजी जाधव यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांना दोन हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथभेट देण्यात येणार आहे. सावंतवाडी येथील सृष्टी प्रशांत पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला असून त्यांना एक हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथभेट मिळणार आहे.
सावंतवाडी येथील लक्ष्मी लक्ष्मण धारगळकर यांना उत्तेजनार्थ प्रथम, तर दोडामार्ग येथील विजय चंद्रकांत ठाकर यांना उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला. या दोघांनाही प्रत्येकी ५०० रुपये रोख आणि ग्रंथभेट देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सात स्पर्धक सहभागी झाले होते. प्रा. एन. डी. कार्वेकर आणि प्रा. मिलिंद कासार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २०२६ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असून यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिके, ग्रंथभेट, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.











