वडाचापाटच्या श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलचे यश; विद्यार्थ्यांच्या काव्यप्रतिभेला मिळाले व्यासपीठ
मालवण : विद्यार्थ्यांमध्ये काव्यलेखन आणि काव्यवाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने आयोजित स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट येथील निधी निनाद धारपवार हिने प्रथम क्रमांक पटकावला.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या कट्टा शाखेच्या वतीने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याच शाळेतील कणिका मंगेश पाटकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला. वराडकर हायस्कूल, कट्टा येथील ओंकार साहिल रोहिलकर यानेही द्वितीय क्रमांक पटकावला.
श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट येथील वैदेही वामन लाड हिने तृतीय क्रमांक मिळविला. चैताली उमेश सावंत, वेदांत गुरुप्रकाश म्हाडगुत, सिया सचिन पाताडे आणि गायत्री गणेश साळुंके यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले.
या स्पर्धेत १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शोभा म्हाडगुत आणि पद्मनाभ शिरोडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कविता सादर करत आपल्या कल्पनाशक्तीचा आणि भाषिक अभिव्यक्तीचा परिचय करून दिला.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २०२६ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असून यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिके, ग्रंथभेट, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.











