स्थानिक क्रांतिवीरांच्या कार्याची ओळख करून देण्याचा उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
मालवण : विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकलेची आवड निर्माण व्हावी आणि स्थानिक क्रांतिवीरांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत पार्थ प्रदीप सामंत आणि अस्मी अशोक आठलेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
२५ ऑक्टोबर रोजी आयोजित या स्पर्धेत अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण येथील पार्थ सामंत आणि अस्मी आठलेकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ओझर विद्यामंदिर, मालवण येथील स्वरा चंद्रशेखर कांबळी हिने द्वितीय क्रमांक, तर दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग येथील प्रांजल नामदेव गावडे हिने तृतीय क्रमांक मिळविला.
अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलची सुभी काशिराम झाड हिला उत्तेजनार्थ प्रथम, तर दत्ता सामंत इंग्लिश स्कूलची वैष्णवी विश्राम गावडे हिला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला.
या स्पर्धेत ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून पद्मनाभ शिरोडकर आणि दीपक भोगटे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे संयोजन दीपक भोगटे, डॉ. ज्योती बुवा तोरसकर, ऋतुजा केळकर, गौरी केळुसकर, मनाली वेंगुर्लेकर आणि नेहा हुन्नारी यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असून, विजेत्यांना रोख पारितोषिके, ग्रंथभेट, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.









