वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन; दोन्ही गटांतील विजेत्यांना रोख पारितोषिके आणि ग्रंथभेट
मालवण : वाचनसंस्कृती रुजविण्यासोबतच प्रभावी अभिवाचनकलेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित अभिवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. युवा गटात वैश्विका नागेश कदम हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर खुल्या गटात मालवण येथील दीपक धर्माजी जाधव यांनी बाजी मारली.
१८ ऑक्टोबर रोजी नववी ते पदवी या वयोगटासाठी युवा गटात स्पर्धा घेण्यात आली. वैश्विका कदम हिला प्रथम क्रमांकासाठी एक हजार ५०० रुपये रोख आणि ५०० रुपयांची ग्रंथभेट देण्यात येणार आहे. सुधीर संदीप आरस याने द्वितीय क्रमांक मिळविला असून त्याला ७५० रुपये रोख आणि ५०० रुपयांची ग्रंथभेट मिळणार आहे.
स्वरा चंद्रशेखर कांबळी आणि प्राची संतोष वेंगुर्लेकर यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला. पार्थ उमेश सामंत याला उत्तेजनार्थ प्रथम, तर भक्ती खरवते हिला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला.
खुल्या गटात दीपक धर्माजी जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शुभ्रा शांताराम कांदळगांवकर यांनी द्वितीय, तर स्वाती संदीप हळदणकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. नचिकेत नारायण पवार यांना उत्तेजनार्थ प्रथम, तर तारकर्ली येथील अक्षता किशोर कुबल हिला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला.
या स्पर्धेत युवा गटात ३१ आणि खुल्या गटात २० अशा एकूण ५१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. युवा गटाचे परीक्षण वैशाली पंडित आणि रघुनाथ शेवडे यांनी, तर खुल्या गटाचे परीक्षण महेश धामापूरकर आणि गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.











